सांगली: जत तालुका राज्यात तीव्र दुष्काळी म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील सनमडीच्या ऊसतोड मजूर पांडुरंग सोपान नरळे यांच्या मुलाने परिस्थितीवर मात करून फौजदार परीक्षेत यश मिळवले.
पांडुरंग नरळे यांनी राजारामबापू कारखान्यात (साखराळे) येथे २५ वर्षे ऊसतोड मजूर म्हणून काम केले. ऊसतोड मजुरी करणाऱ्या नरळे यांनी मुलगा काशिनाथला सांगोला तालुक्यातील किडेबिसरी येथे शिक्षणासाठी ठेवले.
दहावीत असताना काशिनाथ यांनी रोजगार हमीसह ऊसतोडी काम केले. १२ वीला विज्ञान शाखेत चांगले गुण मिळवून जत येथे गोब्बी कॉलेजमध्ये डीएड्ला प्रवेश मिळवला. पण आर्थिक विवंचनेतून अर्ध्यातून शिक्षण सोडावे लागले. २००८ ला राज्य राखीव पोलिस दलात भरती झाले. आठ वर्षे गडचिरोली येथे सेवा केल्यानंतर लातूर येथे कार्यरत झाले. २०१६ मध्ये लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेत ४०० पैकी २५६ गुण मिळवून ५०१ व्या क्रमांकाने पहिल्या प्रयत्नात ते उत्तीर्ण झाले.
Source: Sakal 17 May 2017