Latest Posts

एका शेतकऱ्याच्या मुलाने यशस्वी आय टी कंपनी स्थापन केली

तो गरीबीशी लढला आणि मात केली. मल्याळी असल्याने आपल्या मल्लु उच्चारण आणि खाण्याच्या सवयींमुळे त्याला खूप चिडवले गेले. त्याला वर्णद्वेषाचा त्रास झाला. आपल्या कुटुंबासाठी फुटबॉल वरच्या प्रेमयाचा त्याला त्याग करावा लागला.

आज, केरळच्या लहान खेड्यातून आलेल्या या वरुण चंद्रनने एक यशस्वी आयटी कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीचे तो सीईओ आहे आणि एक लक्षाधीश आहे. महत्वाचे म्हणजे, ज्या लहान गावात त्याचा जन्म झाला, तिथे त्याने आपल्या कंपनीची एक शाखापण उघडली आहे.

वरुण यांचा जन्म केरळमध्ये कोलाममजवळ पादम नावाच्या छोटया गावात झाला. तिथे ८०० कुटुंबे जवळपासच्या जंगलामध्ये काम करणारे गरीब भूमिहीन कामगार होते. गावात वीज नसल्याने केरोसीनच्या दिवाच्या प्रकाशाखाली अभ्यास करावा लागत असे. त्याची आई आपल्या घराबाहेर किराणा दुकानात चालवत असे. ती एक जिद्दी महत्त्वाकांक्षी महिला होती, जिने मुलांनी शेजारच्या मोठया गावात इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घ्यावे असा आग्रह धरला.

त्यांचे किराणा दुकान चांगले चालत नसे आणि आर्थिक परिस्थिती बिकट होती. कर्जबाजारीपणामुळे त्यांच्या घरामधल्या सर्व वस्तू गमवाव्या लागल्या होत्या आणि फरशीवर झोपण्याची वेळही आली होती. शाळेची फी फक्त २५ रुपये इतकी होती पण त्याचे आईबाबा सहा/सात महिने शुल्क भरू शकले नाहीत म्हणून त्याला अनेकदा वर्गाबाहेर फेकण्यात येण्यासारख्या अपमानास्पद अनुभवातून जावे लागले होते. नंतर त्यांना एका बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्यात आले आणि वरुण यांच्या जीवनात बदल झाला.

Source: Rediff.com

ऊसतोड मजुराचा  मुलगा बनला पीएसआय

सांगली: जत तालुका राज्यात तीव्र दुष्काळी म्हणून ओळखला जातो. या तालुक्‍यातील सनमडीच्या ऊसतोड मजूर पांडुरंग सोपान नरळे यांच्या मुलाने परिस्थितीवर मात करून फौजदार परीक्षेत यश मिळवले.

पांडुरंग नरळे यांनी राजारामबापू कारखान्यात  (साखराळे) येथे २५ वर्षे ऊसतोड मजूर म्हणून काम केले. ऊसतोड मजुरी करणाऱ्या नरळे यांनी मुलगा काशिनाथला सांगोला तालुक्‍यातील किडेबिसरी येथे शिक्षणासाठी ठेवले.

दहावीत असताना काशिनाथ यांनी रोजगार हमीसह ऊसतोडी काम केले. १२ वीला विज्ञान शाखेत चांगले गुण मिळवून जत येथे गोब्बी कॉलेजमध्ये डीएड्‌ला  प्रवेश मिळवला. पण आर्थिक विवंचनेतून अर्ध्यातून शिक्षण सोडावे लागले. २००८ ला राज्य राखीव पोलिस दलात भरती झाले. आठ वर्षे गडचिरोली येथे सेवा केल्यानंतर लातूर येथे कार्यरत झाले. २०१६ मध्ये लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेत ४०० पैकी २५६ गुण मिळवून ५०१ व्या क्रमांकाने पहिल्या प्रयत्नात ते उत्तीर्ण झाले.

Source: Sakal 17 May 2017

कचरा वेचणाऱ्या कौशल्या ‘मॅडम’ झाल्या

जिद्दी महिलेची यशोगाथा – राजेंद्रनगरातील झोपडपट्टीत शिक्षणाने झाले परिवर्तन

कोल्हापूर: दुसरी उत्तीर्ण असलेल्या कचरा गोळा करणाऱ्या कौशल्या दत्तात्रय कांबळे आज ‘मॅडम’ झाल्या आहेत. कचरा गोळा करीत असतानाच त्यांनी अंगणवाडी शिक्षिकेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. बैलगाडीवरून हमाली करणाऱ्या, तसेच दारू पिणाऱ्या पतीबरोबर ‘कौशल्या’ने संसार केला.

अंगणवाडी मदतनीस म्हणून नोकरी सुरू केली. कौशल्याची जिद्द पाहून दत्तात्रयने दारू सोडली. बैलगाडीच्या ठिकाणी टेम्पो घेतला. कौशल्या शिक्षित झाल्याने दत्तात्रय तिला ‘मॅडम’ म्हणू लागले आणि आज याच कौशल्याबाईंना ‘अंगणवाडी सेविका’ म्हणून ‘प्रमोशन’ मिळाले. कौशल्या आज खऱ्या अर्थाने ‘मॅडम’ झाल्या.

नागाळा पार्कातील झोपडपट्ट्या राजेंद्रनगरात स्थलांतरित झाल्या. त्यातच कौशल्याचा संसारही स्थलांतर झाला. पती हमाली करीत होता; पण त्याला दारूचे व्यसन होते. तरीही जिद्दीने त्यांनी संसाराला हातभार लावला. तीन मुले शेजाऱ्यांकडे ठेवून त्या कचरा-स्क्रॅप गोळा करायला जाऊ लागल्या. एक दिवस कौशल्याचा भाऊ घरी आला. कौशल्या तेव्हा कचरा गोळा करण्यासाठी आणि मुले रस्त्यावर असल्याची अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. पेशाने शिक्षक असलेल्या भावाने कौशल्याची समजूत काढून तीनपैकी दोन मुले आपल्या गावी शिक्षणासाठी नेली.

एक दिवस याच परिसरातील ज्ञानदीप विद्यामंदिर संस्थेच्या कल्पना तावडेंकडे अंगणवाडी शिक्षकांचा अभ्यासक्रम सुरू झाल्याचे कौशल्यांना कळाले. शाळेच्या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या गवंडी महिलेने ही माहिती कौशल्याला सांगितली. कौशल्या तिच्याबरोबर गेली आणि तिचा प्रवेश निश्‍चित झाला. पुढे अनेक समस्यांना तोंड देत कौशल्याने प्रथम श्रेणीत अभ्यासक्रम पूर्ण केला. तावडे यांच्या शाळेत पहारेकरी म्हणून राहू लागल्या. त्यांच्याच बालवाडीत काम सुरू केले. पुढे शासनाच्या अंगणवाडीत त्यांना मदतनीस म्हणून नोकरी मिळाली.

कल्पना तावडेंच्या मार्गदर्शनाखाली कौशल्या शिकल्या. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बी.ए.ची पदवी घेतली. पत्नीला लिहिता-वाचता येते हे पाहून दारू पिऊन मारहाण करणाऱ्या दत्तात्रय यांनी स्वतःची वागणूक बदलली. कौशल्याला ते चेष्टेने ‘मॅडम’ म्हणून बोलवू लागले. येथेच खऱ्या अर्थाने कौशल्याच्या जिद्दीला यश आले होते. त्यानंतर कौशल्याच्या संसाराला उभारी मिळाली. दत्तात्रय यांनी कौशल्याच्या हातभाराने बैलगाडी सोडून छोटा टेम्पो घेतला. दत्तात्रयची दारू पिणे कमी झाले. दोन मुले हाताखाली आले. मामाकडे असणारी मुले कौशल्यांकडे राहण्यास आली.

आता त्यांनीही ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. बायंडिगमधून मिळालेल्या कागदांचे तुकडे वेगळे करण्याचे काम एक मुलगा आणि दत्तात्रय करीत आहेत. साळोखे पार्क येथील शासनाच्या अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम करीत असतानाच कौशल्यांना सेविका अर्थात अंगणवाडी शिक्षक म्हणून ‘प्रमोशन’ मिळाले. हे सांगताना कौशल्या यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्वीगणित झाला होता.

खऱ्या अर्थाने आज त्या कचरा वेचणाऱ्या महिलेपासून ‘मॅडम’ झाल्या.

शिक्षणामुळेच हे शक्‍य झाले – कौशल्या कांबळे
सासरचे सगळचे अडाणी, त्यांना शिक्षणाबद्दल तिरस्कार होता. मला शिक्षणाची गोडी होती. म्हणून मी दुकानातून डाळ, गूळ बांधून दिलेल्या पेपरातील (वृत्तपत्र) बातम्यांचे एक एक अक्षर वाचत होते. आज मला संस्कृत, मराठी, हिंदी या भाषा येतात. कचरा वेचत असते तर कचरावाली बाईच असते. कल्पना तावडेंच्या मार्गदर्शनामुळे आज मी ‘मॅडम’ झाले असल्याचे साळोखे पार्कातील पत्र्याच्या अंगणवाडीत बसून कौशल्या आनंदाने सांगत होत्या.

ती घटना आजही आठवते
कुर्डूवाडी (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथे माझे माहेर. एक दिवस पती आणि मी रेल्वेची वाट पाहत थांबलो होतो. एक महिला आठ-दहा वर्षांच्या मुलीचा छळ करीत होती. स्थानकावरील सर्व जण पाहत होते. मला सहन झाले नाही. मी तिला शिव्या देऊन कोणाची मुलगी आणलीस, असे विचारले आणि ती घाबरली. माझा आवाज पाहून स्थानकावरील बघ्याची भूमिका घेणारे सगळे पुढे आले. पोलिस आले आणि त्या महिलेने गल्लीतील मुलगी उचलून आणली होती हे कळाले. पुढे पोलिसांनी तिला परतीच्या रेल्वेत बसवून पुन्हा मुलीला त्यांच्या कुटुंबीयाकडे सोडण्यास सांगितले.

Source: Sakal 31 July 2017

रेल्वे कर्मचाऱ्याचा मुलगा झाला ‘आयएएस’

पुणे: माणसांच्या गर्दीने कायम गजबजलेली मातोश्री रमाबाई आंबेडकर वस्ती (ताडीवाला रस्ता)… अवैध धंद्यांपासून ते गुन्हेगारी प्रकाराच्या अनेक गोष्टी इथे घडतात… मात्र याच वस्तीत रेल्वेच्या ‘डिझेल कॉलनी’त राहणारा एक मुलगा प्रतिकूलतेवर मात करत भारतीय प्रशासकीय सेवेची (आयएएस) परीक्षा उत्तीर्ण होतो. ऐवढेच नाहीतर तो देशात १६० व राज्यात सातवा क्रमांक मिळवीत यशाच्या सर्वोच्च स्थानी पोचतो… रेल्वे कर्मचाऱ्याचा हा मुलगा आहे, दिनेश रमेश गुरव!

घोरपडी येथील रेल्वेच्या डिझेल लोकोशेडमध्ये ३५ वर्षांपासून काम करणारे रमेश गुरव. दिनेशच्या जन्मापासूनच ते रमाबाई आंबेडकर वस्तीमध्ये डिझेल कॉलनीत वास्तव्य करत आहेत. तेथील दोन छोट्या खोल्यांमध्ये चार-पाच जणांचे गुरव कुटुंब अनेक वर्षांपासून राहात आहे. अवतीभोवतीचे वातावरण शिक्षणासाठी पूरक नाही, परंतु अशाही परिस्थितीत ‘वस्तीमधील मित्र कसेही असू दे, त्यांना आपल्यासारखेच हुशार बनवायचे,’ असे संस्कार दिनेशवर घरात होत गेले.

घरात मी एकटाच कमावणारा आहे, याची दिनेशला जाणीव होती. त्यामुळे त्याने मोबाईल, गाडी किंवा मौजमजेसाठी कधीच अट्टहास केला नाही, याउलट त्याला मिळालेल्या शिष्यवृत्तीतूनच त्याने लॅपटॉप व गाडी घेतल्याचे रमेश गुरव सांगतात. त्याला मिळालेले पुरस्कारांनी भरलेले कपाट दाखविताना ते भरभरून कौतुकही करतात. न्यू इंग्लिश स्कूल रमणबागमध्ये असताना दिनेशने दहावी, बारावीमध्ये कायम ‘टॉपर’ राहिला. फर्ग्युसन महाविद्यालयानंतर पुण्याच्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये (सीओईपी) ‘बीटेक’साठी प्रवेश मिळाला. ‘सीओईपी’ने ‘उन्नत भारत अभियान’अंतर्गत जुन्नरमध्ये घेतलेले शिबिर आणि ‘चाणक्‍य’ची मेळघाट येथील भेट, या दोन ठिकाणचे वास्तव पाहिल्यानंतर दिनेशने केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा देऊन ‘आयएएस’ होण्याचे ठरविले. त्यानुसार अभ्यास करत दुसऱ्या प्रयत्नातच त्याने यश मिळविले.

दररोज सकाळी सहा वाजता उठून योगा, धावणे, ध्यानधारणा करण्यास दिनेश प्राधान्य देतो. त्यामुळे ताण-तणावावर नियंत्रण मिळविणे त्याला शक्‍य झाले. ‘सीओईपी’ची अभ्यासिकेबरोबरच ‘यूपीएससी’चे मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांकडून मार्गदर्शन घेतानाच त्याने ‘सेल्फ स्टडी’ला अधिक महत्त्व दिले. दिनेश सांगतो, ‘‘वस्तीमधील मित्रांनाही चांगले शिक्षण कसे मिळेल, यासाठी प्रयत्न केला. ‘आयएएस’ परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर खेड्यापाड्यात जाऊन या परीक्षेविषयी जागृती करत आहे. आयुष्यात कुठलीही गोष्ट अशक्‍य नाही, त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.’’

Source: Sakal Pune 31 Jul 2017