कचरा वेचणाऱ्या कौशल्या ‘मॅडम’ झाल्या

जिद्दी महिलेची यशोगाथा – राजेंद्रनगरातील झोपडपट्टीत शिक्षणाने झाले परिवर्तन

कोल्हापूर: दुसरी उत्तीर्ण असलेल्या कचरा गोळा करणाऱ्या कौशल्या दत्तात्रय कांबळे आज ‘मॅडम’ झाल्या आहेत. कचरा गोळा करीत असतानाच त्यांनी अंगणवाडी शिक्षिकेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. बैलगाडीवरून हमाली करणाऱ्या, तसेच दारू पिणाऱ्या पतीबरोबर ‘कौशल्या’ने संसार केला.

अंगणवाडी मदतनीस म्हणून नोकरी सुरू केली. कौशल्याची जिद्द पाहून दत्तात्रयने दारू सोडली. बैलगाडीच्या ठिकाणी टेम्पो घेतला. कौशल्या शिक्षित झाल्याने दत्तात्रय तिला ‘मॅडम’ म्हणू लागले आणि आज याच कौशल्याबाईंना ‘अंगणवाडी सेविका’ म्हणून ‘प्रमोशन’ मिळाले. कौशल्या आज खऱ्या अर्थाने ‘मॅडम’ झाल्या.

नागाळा पार्कातील झोपडपट्ट्या राजेंद्रनगरात स्थलांतरित झाल्या. त्यातच कौशल्याचा संसारही स्थलांतर झाला. पती हमाली करीत होता; पण त्याला दारूचे व्यसन होते. तरीही जिद्दीने त्यांनी संसाराला हातभार लावला. तीन मुले शेजाऱ्यांकडे ठेवून त्या कचरा-स्क्रॅप गोळा करायला जाऊ लागल्या. एक दिवस कौशल्याचा भाऊ घरी आला. कौशल्या तेव्हा कचरा गोळा करण्यासाठी आणि मुले रस्त्यावर असल्याची अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. पेशाने शिक्षक असलेल्या भावाने कौशल्याची समजूत काढून तीनपैकी दोन मुले आपल्या गावी शिक्षणासाठी नेली.

एक दिवस याच परिसरातील ज्ञानदीप विद्यामंदिर संस्थेच्या कल्पना तावडेंकडे अंगणवाडी शिक्षकांचा अभ्यासक्रम सुरू झाल्याचे कौशल्यांना कळाले. शाळेच्या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या गवंडी महिलेने ही माहिती कौशल्याला सांगितली. कौशल्या तिच्याबरोबर गेली आणि तिचा प्रवेश निश्‍चित झाला. पुढे अनेक समस्यांना तोंड देत कौशल्याने प्रथम श्रेणीत अभ्यासक्रम पूर्ण केला. तावडे यांच्या शाळेत पहारेकरी म्हणून राहू लागल्या. त्यांच्याच बालवाडीत काम सुरू केले. पुढे शासनाच्या अंगणवाडीत त्यांना मदतनीस म्हणून नोकरी मिळाली.

कल्पना तावडेंच्या मार्गदर्शनाखाली कौशल्या शिकल्या. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बी.ए.ची पदवी घेतली. पत्नीला लिहिता-वाचता येते हे पाहून दारू पिऊन मारहाण करणाऱ्या दत्तात्रय यांनी स्वतःची वागणूक बदलली. कौशल्याला ते चेष्टेने ‘मॅडम’ म्हणून बोलवू लागले. येथेच खऱ्या अर्थाने कौशल्याच्या जिद्दीला यश आले होते. त्यानंतर कौशल्याच्या संसाराला उभारी मिळाली. दत्तात्रय यांनी कौशल्याच्या हातभाराने बैलगाडी सोडून छोटा टेम्पो घेतला. दत्तात्रयची दारू पिणे कमी झाले. दोन मुले हाताखाली आले. मामाकडे असणारी मुले कौशल्यांकडे राहण्यास आली.

आता त्यांनीही ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. बायंडिगमधून मिळालेल्या कागदांचे तुकडे वेगळे करण्याचे काम एक मुलगा आणि दत्तात्रय करीत आहेत. साळोखे पार्क येथील शासनाच्या अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम करीत असतानाच कौशल्यांना सेविका अर्थात अंगणवाडी शिक्षक म्हणून ‘प्रमोशन’ मिळाले. हे सांगताना कौशल्या यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्वीगणित झाला होता.

खऱ्या अर्थाने आज त्या कचरा वेचणाऱ्या महिलेपासून ‘मॅडम’ झाल्या.

शिक्षणामुळेच हे शक्‍य झाले – कौशल्या कांबळे
सासरचे सगळचे अडाणी, त्यांना शिक्षणाबद्दल तिरस्कार होता. मला शिक्षणाची गोडी होती. म्हणून मी दुकानातून डाळ, गूळ बांधून दिलेल्या पेपरातील (वृत्तपत्र) बातम्यांचे एक एक अक्षर वाचत होते. आज मला संस्कृत, मराठी, हिंदी या भाषा येतात. कचरा वेचत असते तर कचरावाली बाईच असते. कल्पना तावडेंच्या मार्गदर्शनामुळे आज मी ‘मॅडम’ झाले असल्याचे साळोखे पार्कातील पत्र्याच्या अंगणवाडीत बसून कौशल्या आनंदाने सांगत होत्या.

ती घटना आजही आठवते
कुर्डूवाडी (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथे माझे माहेर. एक दिवस पती आणि मी रेल्वेची वाट पाहत थांबलो होतो. एक महिला आठ-दहा वर्षांच्या मुलीचा छळ करीत होती. स्थानकावरील सर्व जण पाहत होते. मला सहन झाले नाही. मी तिला शिव्या देऊन कोणाची मुलगी आणलीस, असे विचारले आणि ती घाबरली. माझा आवाज पाहून स्थानकावरील बघ्याची भूमिका घेणारे सगळे पुढे आले. पोलिस आले आणि त्या महिलेने गल्लीतील मुलगी उचलून आणली होती हे कळाले. पुढे पोलिसांनी तिला परतीच्या रेल्वेत बसवून पुन्हा मुलीला त्यांच्या कुटुंबीयाकडे सोडण्यास सांगितले.

Source: Sakal 31 July 2017

Leave a Comment